*शेतकरी*



   






'शेतकरी' नाव तर परिचयाचंच आहे ना ? जगाचा पोशिंदा, बळीराजा असेही नाव यांना आहेत.आज शेतकरी नाव टी.व्ही वर कधी ऐकलं तर बहुतेकांच्या मनात आत्महत्या, कर्जमाफी एवढंच पुरत जागी येईन आणि त्यांत त्यांचं काही चुकलं ही नसेल कारण त्यापलीकडे त्या शेतकऱ्याकडे कोणी वळून बघितलेच नाही ना,अरे कधी त्याच जीवन कस आहे याकडे कधी विचार केलाय का ?
           दिस-रात हाती काम , तो कधी सुट्टीही घेत नाही.सतत निसर्गचक्रासोबत झुंजत राहतो, खर तर असं जीवन जगण्याचं धैर्य त्याच्याकडेच असतं. आज मोठ-मोठ्या हॉटेलात पिझ्झा-बर्गर खाणारी मंडळी आपला मोठेपणा मिरवण्यासाठी वरून टिप्स देतात.पण हेच लोक भाजीपाला खरेदी करताना मात्र 5 रुपये कमी करण्यासाठी वाद घालतात, इथे त्यांना खरा मोठेपणा वाटत नाही का ?
            आज आम्ही साधी चप्पल शिवायला चांभाराकडे गेलो तर तिथे खिळे मारण्यापासून ते पॉलिशपर्यंत सर्व दर फिक्स असतात. सलून मध्ये जा, कोणत्याही कारागिराकडे जा ,व्यावसायिकाकडे जा किंवा कोणत्याही कंपनीचे उत्पादन घ्या,प्रत्येकजण आपल्या श्रमाचा त्यात योग्य तो फायदा घेऊन स्वतः मूल्य निर्धारण करतो. मात्र शेतीत अस काहीच  होत नाही.इथे मात्र शेतकरी स्वतःच्या मनाने पीक घेतो पण  त्याचा भाव त्याला स्वतःला ठरवता येत नाही.कसल हे जोखमीच काम ज्यात स्वतःचा मोबदला ही ठरवता येत नाही,अजब व्यवस्था आहे ही अन्नदात्याला भिकेला लावणारी.
       यातच आम्हाला महागडे मोबाईल, चैनीच्या वस्तू उत्पादने यांचे भाव वाढलेत तर चालतात मात्र शेतकऱ्याच्या कांद्याचा भाव मात्र आम्हाला रडवतो. आमचा सरकारला विरोध सुरू होतो.वाढलेले भाव लगेच कमी करायला सरकारला आम्ही लोक भाग पडतो. कधीतरी त्या शेतकऱ्याच्या जीवनात आलेला आनंद आम्हाला सहनच होत नाही.
 जेव्हा सर्व शेतकऱ्यांनी एकच पीक घेतल्यामुळे भाजीपाला कवडीमोल भावाने विकला जातो,तेव्हा आम्हाला शेतकऱ्याची काय  अवस्था असेल यावर चिंतन करायलाही वेळ नसतो. पण अशावेळी त्या शेतकऱ्यावर मात्र कर्जाच ओझं चालू होतं हे जाणून घ्यायला हवं.कारण यात गुंतवणुकीपेक्षाही क्षुल्लक रक्कम त्याच्या हाती आलेली असते.आणि तेव्हा जगण्यासाठी कर्जाशिवाय पर्यायच उरत नाही.
           स्वतःच्या घराच  छत जरी गळक असलं तरी मात्र दुष्काळात जर पाऊस पडला तर त्याच्याइतका आनंद कुणाला होणारच नाही.कारण दुष्काळात त्याच्यावर जे संकट ओढावल जात ते  संकट आयुष्यात कधीच कुणावर  ओढावल जात नाही, कारण कधी-कधी  हा दुष्काळच त्याचं जीवघेण कारण बनतो.त्याला आत्महत्येला प्रवृत्त करतो. खरंतर ही आत्महत्या असते की खून हेच कळतं नाही.आपली पोटाची खळगी भरून रहावी म्हणून हा शेतकरी उपाशी पोटीच शेतात राबतो.पीक उगवतो.पण त्यातही कधी त्याला सरकार योग्य भाव देत नाही.तर कधी राब-राब राबून निसर्गच त्याला साथ देत नाही.त्यातच पिकांचा भाव कधी चुकून वाढला तर जनतेला तेच  खपत नाही,कसला हा खेळ ?
   "शेतकऱ्याच्या देठालाही हात लावणाऱ्याचे हात कलम केल्या जाईल." ही शपथ ज्या स्वराज्यावर घेतली गेली आज त्याच भूमीवर शेतकऱ्यास आत्महत्या करण्याची वेळ येतेय हे दुर्दैव आहे.आज जरी माझा शेतकरी राजा  निस्वार्थपणे काम करतो आपल्या मेहनतीने जगाचं पोट भरतो.पण ज्यांच्यासाठी तो काम करतोय ते सर्वच स्वार्थी झाले आहेत.
            तो एक काळ होता माझ्या शिवरायांचा,जेव्हा शेतकऱ्यास  कसलीही  भीती नव्हती. कारण निसर्गाने जरी साथ सोडली तरी मात्र या शासनात शेतकऱ्याचं रक्षण ही शासनकर्त्यांनी उचललेली  जबाबदारी होती आणि आजचा हा काळ जिथे राजकीय नेते शेतकरी जेव्हा न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरतात तेव्हा त्यांच्यावर आक्षेप करतात.
 मात्र हेच लोक राजकारणात स्वतःची खुर्ची पक्की करण्याचं जेव्हा काम असते.तेव्हा शेतकऱ्याला कर्जमाफी नावाच्या आश्वासनाच गाजर देतात व शेतकऱ्याच्या माध्यमातून आपली खुर्ची पक्की करण्याचं काम करतात.
          आयुष्यात कधीही आठवणीत नसलेला शेतकरी मात्र त्यांना निवडणुकांच्याच वेळी आठवतो,त्यांचे प्रश्न जणू आता त्यांना एकदम कळवळीचे वाटायला लागतात,स्वार्थापोटी सर्वजण फक्त शेतकऱ्याचा वापर करतात यापलीकडे काहीच नाही.
शेतकरी आणि कर्ज अस नातं म्हणजे शेतकऱ्याला कर्जाची गरज लागते हे आम्हाला  लहानपणापासूनच आमच्या मनावर बिंबवलं. कारण गणित शिकवताना जेव्हा सरळ व्याज,चक्रवाढ व्याज शिकवले जाते तेव्हा ते शिकवताना अमुक शेतकऱ्याने अमुक कर्ज घेतले तर व्याज किती असेच शिकवले जाते.त्यामुळे शेतकऱ्याला कर्ज लागतेच हेच मनात कोरले जाते.
          आज खरं तर शेतकऱ्याला कर्जमाफी करणाऱ्या सरकारची गरज नाही तर कर्ज मागण्याची वेळच येऊ नये.अशा उपाययोजना करणाऱ्या सरकारची गरज आहे. आज आमच्या गरीब शेतकऱ्यांची मुलं पैशाअभावी उच्च शिक्षण घेऊ शकत नाही तर काही ठिकाणी सरकार गावच्या  सरकारी शाळा बंद करण्याच्या मार्गावर आहेत. मग शेतकऱ्यांच्या मुलांनी शिकावे तरी कुठे? कारण महागड्या प्रायव्हेट शाळेत शिकवणे प्रत्येक शेतकऱ्याला शक्यच होत नाही आणि अशाच कारणांमुळे खर तर बहुतांश शेतकरी तंत्रज्ञान अभावी आहे.आज शेतकऱ्याला अस वाटत नाही की आपल्या मुलाने शेती करावी. कारण  या दुचक्रात आपल्या मुलांनी फसावे असे त्याला कधीच वाटनार  नाही, कारण कोणत्याच शेतकऱ्याला इथे कधी कामाचा योग्य तो मोबदला मिळतच नाही.
                 सरकारने असा कायदा करायला हवा की कोणतीही नोकरी तेव्हाच मिळेल जेव्हा त्या व्यक्तीने 2 वर्ष सतत शेतीत काम केलेले असेल.यामुळे शेतकऱ्याला येणाऱ्या अडचणी, दुःख, संकट याची प्रत्येकाला जाण होईल. शेतकऱ्याला स्वतःच्या पिकाचा  हमीभाव ठरवण्याचा आधिकार सुद्धा सरकारने द्यायला हवा. ज्यामुळे आजचा शेतकरी हा उत्साहाने पुन्हा कामात गुंतेल.तसेच इतर देशांप्रमाणे भारतात शेती हा  विषय शिक्षणात समाविष्ट करायला हवा. ज्यामुळे शेतीत आधुनिक बदल तसेच देशाला अनेक यशस्वी शेतकरी मिळेल.
                                                                                                                               

                                                                                                                                     धन्यवाद  ......... !
























https://en.wikipedia.org/wiki/Agricultural_education





1 تعليقات

‏قال VMS....
खूप छान विचार मांडले आहेत..👌👌👍👍
أحدث أقدم